Monday, August 13, 2012

आठवणी.. चिंब ओल्या..

खूप काही लिहावसं वाटतंय पण सुचत काहीच नाही...

भावना मनात दाटलेल्या पण ओठांवर काहीच उमटत नाही..

आज अचानक सरस्वती देवी का अशी रागवली माझ्यावर

तिच्या आशीर्वादांची चाहूल दूरवर कुठेच लागत नाही..



पाऊस पडतो आहे बेभान, मन असंच वारा वारा..

घेऊन येतंय मुठीत पकडून खाली पडलेल्या गारा..

कशाच्या धुंदीत इतकं गुंतलंय कळतच नाहीये

त्या इंद्रधनुच्या मागे सुसाट पळतंय सैरावैरा..



लहानपणीचे दिवस आठवून मग मन ही गेलं भूतकाळात..

शाळेतून परत येतानाचं भिजणं आणी रेनकोट मात्र दप्तरात..

ओलीचिंब छकुली पाहून मग आईचं खोटा खोटा राग-रुसवा

जो बुडून जायचा चहाच्या एका गरम गरम घोटात ..



मैत्रिणींसोबत भिजतानाची आठवली ती मस्ती..

होस्टेलच्या अंगणात जेव्हा एखादी कोकीळ गाणे गाती..

सुख-दु:खाच्या आठवणी एकमेकींकडे साठवताना

नकळत दिलेल्या वचनांनी जसे आज स्मरतात सोबती..



आज ही आहे तोच पाऊस, आजही कोकिळेचा आवाज आहे..

त्यातलं माधुर्य मात्र केव्हाच गळून गेलं आहे..

सख्यांना आठवता आठवता पाणावलेले डोळे

ते पुसायला ही आज फक्त स्वत:चाच हात आहे..

Monday, May 9, 2011

प्रथम तुला पहाताना...

सखे आज उगवला बघ दिन सोनियाचा,
पहिला मी प्रथमच मुखडा माझ्या पिल्लाचा..

तुला पहाताना बाबांची पापणी मिटेना,
तुझी प्रत्येक हालचाल माझ्या मनातुन सरेना..

छोटुकली ही कळी कशी उलमते आहे आतल्या आत,
बाबा म्हणतात पिल्लु नाचतयं पोटातल्या पोटात..

तुझी heartbeat ऐकली, तुझं heart पाहिलं,
माझ्याच उरि तेव्हा किती धकधक झालं..

परत केव्हा दिसतील् ते एवलेशे हात-पाय,
कोकराला पहायला आतुर तुझी ही माय॥
गोड चाहुल पहिली...

ती गोड रेशमी संध्याकाळ गुलाबी झालर ल्याली होती,
कारण देवतांनी अलगद येउन ओटी माझी भरली होती..

गोड नाजुक रोपटं फुलेल आता माझ्या अंगणी,
कोणास ठाऊक काय असेल, मोगरा कि रातराणी..

हासु आणि मस्तीने आता माझं घर भरेल,
बाळाच्या लडिवाळ बोलण्याने ते ही सुखावेल..

शब्दानां गोंजारत जेव्हा पिल्लु लागेल बोलु,
ते ही म्हणतील, या गोडव्यात अर्थच विसरुन जाऊ..

किती स्वप्नं माझी मी आतापासुन रंगवतेय,
तुला मांडीवर घ्यायची मी खुप वाट पहातेय..

Thursday, December 9, 2010

माथेरानची शोभा

स्वच्छ निर्मळ हवेत खुलते निसर्गाची आभा,
लोभवते आपल्याला ही माथेरानची शोभा..

खोलवर दरी इथे तिन्ही बाजूंना वसलेली,
हिरवीगार राई तिथे चौफेर पसरलेली..

कडेकपारीतुन खळ्खळुन हसणारे पाणी,
थक्क होतं मन ऐकुन ती निसर्गवाणी..

लांबुन दरीमध्ये दिसतं एक तळं छोटसं,
आपल्याकडे पहात ते खुदकन् हसतं छानसं..

क्षितिजाच्या सीमेवर लालबुंद गोळा झुकलेला,
मावळतीला जाताना कसा रंग उधळुन गेला..

लाल-नारिंगी-सोनेरी, धवल-चंदेरी नि पिवळा,
निळ्या निळ्या आकाशी असा रंगांचा रम्य सोहळा..

या निसर्गाला भरुन घ्यावं मनाच्या कवेत,
उतरवावं ते सौंदर्य मग एखाद्या कवितेत..

Thursday, December 2, 2010

Happy Marriage Anniversary To Aho Aai Baba

ती निरागस ज्योत एका क्षणी मंद थरथरली,
वा-यासोबत आलेल्या चंदनाच्या सुवासाने भारावली..

दोघांनी मग शपथ घेतली सदा साथ रहाण्याची,
सर्वस्व अर्पण करण्याची तयारी होतीच दोघांची..

हळुच संसारात मग् संभाजी-शिवाजी अवतरले,
आनंदाचे पारडे ज्योतीचे मग पुर्णच खाली झुकले..

जीवापाड कष्ट करुन वाढवलं दोघांनी आपल्या मुलानां,
आपल्या हातावरचं स्वतःच्या पायावर उभं केलं त्यांना..

चौकटीच्या संसारात मग हळुच दोन कळ्या अवतरल्या,
आई-बाबांच्या प्रेमवर्षावात त्या ही सहज खुलल्या..

आमच्या घरात आता असतो प्रत्येक क्षण आनंदाचा,
कारण आशिर्वाद आहे घरावर आमच्या आई-बाबांचा..

घर आमचं जणु देवाचा प्रकाशमय गंधीत गाभारा,
नेहमी सुखी राहोत आई-बाबा, हिच प्रार्थना ईश्वरा..

-- प्राजक्त

Wednesday, July 29, 2009

बाबा


"दमलेल्या बापाची ही कहाणी तुला" हे गाणं संदीपनी नुकतंच लिहीलेलं आहे. या गाण्याला उत्तर म्हणून..

बाबा

कोमेजलेल्या तुमच्या परीची सांगु का तुम्हाला कहाणी,
अस्वस्थ करतात तिला तिच्या बाबांच्या आठवणी..

बागेत कधी तिच्यासोबत लहान झालेले बाबा,
एखाद्या रविवारी picture दाखवणारे बाबा॥
घरी स्वतःच्या ताटातला अर्धा घास कमी करुन,
सगळे माझे हट्ट हसुन पुरवणारे बाबा..

झोपेतही जाणवायचा मला तो मायेचा स्पर्श,
आले बाबा या जाणीवेने मनी दाटलेला हर्ष..

कधी खेळला नसाल बाबा कदाचित माझ्यासोबत;
माझ्या भातुकलीच्या खेळात नेहमीच तुमचा घास होता॥
आई असेल जवळ जरी जेव्हा उभी रहायला शिकले,
दुरुन पहाणारा बाबाही तितकाच हवाहवासा होता..

जरी कमी दिली मला तुमची सोबत देवाने,
खुप सारं जगुन घेतलं मी तुमच्या सहवासात..
जगले ना मी आई सोबत तुमच्याच आठवणीने,
तुम्ही गेल्यानंतरच्या वीस वर्षांत..

लहानपण असेल माझं बाबा तुम्हाविना गेलं,
मी कशी शिकले, कशी खेळले॥ काहीच नाही तुम्हाला पाहता आलं..
पण आहे अजुन ही माझ्या मनात संस्कारधन तुम्ही दिलेलं,
सजवेन मी माझं आयुष्य तुमच्या आठवणींत भिजलेलं..

-- प्राजक्त.

Monday, July 13, 2009

रे सख्या॥


रे सख्या॥


तुझ्या माझ्या नात्याला
काय देऊ मी नाव?
नवरा-बायको आहोतच रे
तरी थोडा वेगळा भाव॥


तुझाच विचार करते मी
आज-काल हरेक क्षणी,
तु असताना रंगलेल्या गप्पा;
अन् एरवी तुझ्या आठवणी॥


आयुष्यातलं मोठं वळण -
नवं नातं, नवी जवळीक,
थांब रे सख्या जरासा;
येइल कशी लगेच मोकळीक॥


तुझ्यासारखा जोडीदार मिळाला,
खरच माझं सौभाग्य आहे..
तुझ्याचमुळे माझ्या जीवनात
गर्भरेशमी हिरवळ आहे॥


चुकले मी वागण्यात कधी
माफ करशील ना मला?
झालं-गेलं सगळं विसरुन
जवळं घेशील ना मला?


साथ देईन मी तुला
अशीच चालेन संगतीने,
तुही असाच राहशील ना
पाठीशी माझ्या हिमतीने?

-- प्राजक्त